भजन, कीर्तनात रमले भाविक   

हनुमान जयंती उत्साहात साजरी 

पुणे : हनुमान जन्माचे कीर्तन.. जयंतीनिमित्त सजवलेली मंदिरे..आणि मारुतीरायाची मूर्ती.. हनुमान चालीसाचे पठण.. अशा भक्तिमय वातावरणात शहरात व उपनगरांत शनिवारी हनुमान जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
 
हनुमान जयंतीनिमित्त शहरातील विविध मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. विविध ठिकाणी सामूहिकरित्या हनुमान स्तोत्र व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. काही देवस्थानातर्फे कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच, भजन, काकड आरती, होमहवन, मंत्रपठण या धार्मिक कार्यक्रमांसह काही देवस्थानांनी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. नारायणपेठ येथील दक्षिणमुखी मारूती मंदिरात देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. महिलांनी भजन व काकड आरती करून मारूतीरायांकडे मानवांच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. 
  
शहरातील १८७४ सालापासून ऐतिहासिक असलेल्या गुलशाची तालीम येथे हनुमान जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. बाजीराव पेशवे दुसरे यांनी या तालमीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. गुलशे तालमीचे वस्ताद पैलवान भूषण दादा विजयराव जाधव यांनी या भागातील युवकांसोबत भगवान हनुमानाची पूजा करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले. पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला रेशमी वस्त्रे व दागिने घालण्यात आले होते. तर, मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
 
शहरातील शनी मारुती मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती.सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख मंदिरांबरोबरच उपनगरांमध्येही हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. शहराच्या विविध भागांत सालासर हनुमान चालिसा मंडळाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या संगीतमय हनुमान चालिसा पठण सोहळ्यात सहकारनगरमधील हनुमान भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेक मंदिरांमध्ये सकाळी रुद्राभिषेक, दुपारी जन्मोत्सव आणि संध्याकाळी महाप्रसाद देण्यात आला. यावेळी मंडळाचे प्रमुख विश्वस्तांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठया संख्येनी उपस्थित होते. रास्ता पेठेतील शिवरकर मळा येथील श्री सूर्यमुखी मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमातून हनुमान जयंती साजरी करण्यात आली. सदाशिव पेठेतील उत्तरमुखी विजय मारुती मंदिरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. होमहवन, महाप्रसादाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
मंगळवार पेठेतील बोलाईखान येथील हनुमान सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीटवर खाण्या मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी होमहवन आणि भजनी मंडळाचा कार्यक्रमही झाला. नाना पेठेतील भोर्डे आळीतील गंजीचा मारुती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.  

Related Articles